पिंपरी: २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक जनरल निरीक्षक म्हणून मनवेशसिंग सिध्दू (भा.प्र.से) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने मनवेशसिंग सिध्दू यांनी पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या कामकाजाची सलग तीन दिवस पाहणी केली. सोमवारी स्ट्रॉग रूम मतदान पेटया वितरण व्यवस्था,मतदान अधिकारी /कर्मचारी यांच्यासाठीचा वाहतूक आराखडा, मतमोजणीसाठी बालेवाडी स्टेडीयम येथील स्ट्रॉग रूम याची पाहणी केली.
तसेच मंगळवारी निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू आणि निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या उपस्थितीत निवडणूक रिंगणातील उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यावेळी सर्व राजकीय पक्षांनी तसेच उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करणे,काही तक्रारी असल्यास C-VIGIL या ऍपवर नोंदवाव्यात. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रचार करताना प्रत्येक गोष्टीची रिसतर परवानगी घेणे आवश्यक असून उमेदवारांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या रॅली, रोड-शो, प्रचार सभा, कोपरा सभा इत्यादी बाबत एक खिडकी कक्ष योजनेअंतर्गत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच उमेदवारांकडून प्रचारासाठी वापरण्यात येणारी स्पिकर आणि वाहने याबाबतही परवानगी घेणे बंधनकारक आहे. याव्यतिरिक्त प्रचार प्रसारासाठी जे पोस्टर्स छपाई करून घेतले जातात त्यावर संबंधित मुद्रणालयाचे नाव, संपर्क क्रमांक छापणे, एकूण छपाई केलेल्या पोस्टर्सचा तपशील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास कळविणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त वर्तमानपत्र व टीव्ही चॅनल्सवर दिलेल्या जाहिराती बाबतचा तपशील कळविणे आवश्यक असल्याचे निर्देश मनवेश सिंग सिध्दू यांनी दिले. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९२७००५१२०६ हा असून त्यांचा Email id – generalobserverpimpriassembly@gmail.com असा असल्याचे जाहिर केले.
तसेच आज बुधवारी सिध्दू यांनी एस एन बी पी शाळा म्हाडा पिंपरी येथील १०, साईशारदा महिला आयटीआय कासारवाडी येथील ४, मनपा शाळा बोपखेल येथील ४ मतदान केंद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रावर मतदारांसाठी पुरविण्यात आलेल्या रॅम्प, सावली मंडप,पाण्याची व्यवस्था,दिव्यांगांसाठी व्हीलचेअर व मदतनीस यांची उपलब्धता व मतदान केंद्रावर मतदारांचे नांवे शोधण्याची सुविधा सेक्टर ऑफीसर यांचे समवेत चर्चा करुन माहिती घेतली व या सुविधा मतदानाच्या दिवशी उपलब्ध करुन देण्याबाबत सुचना दिल्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव , सहा. निर्णय अधिकारी जयराज देशमुख, ई.व्ही. एम. नोडल अधिकारी प्रशांत शिंपी,अनिल खामकर तसेच सहा. आयुक्त पोलिस मुगुटराव पाटील,पोलिस निरिक्षक शत्रुघ्न माळी,बिलाल शेख, पोलिस उप. निरिक्षक अशोक शिर्के, निवडणुक निरिक्षक यांचे पिंपरी विधानसभा समन्वयक हरविंदरसिंग बन्सल, मिडीया नोडल अधिकारी विजय भोजने, मतदान केंद्रे नोडल अधिकारी गिरीष गुठे, सेक्टर ऑफीसर विनायक माने,चंद्रकांत पाटील माणिक चव्हाण आदी उपस्थित होते.