दहशतवादाला खतपाणी घालत शेजाऱ्याला कायम दहशतीच्या छायेखाली ठेवण्याची चाल आता पाकिस्तानच्या गोतास काळ बनत चालली आहे. पाकिस्तानची आजवरची राजकीय चाल पाहता त्यांनी भारताशी कायम वैरत्व पत्करल्याचेच दिसून येते. शेजारी सुखात राहिले तर आपल्या घरातही सुख नांदते ही साधी गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही त्याला कोण काय करणार? दहशतवाद जोपासला की तो कधी ना कधी आपल्यावर उलटतो. स्वतंत्र राष्ट्र बनल्यापासून पाकने भारताबद्दल कटुता बाळगली आहे. आज पाकिस्तान भिकेकंगाल बनला आहे, तरीही तो भारतातील शीख समुदायाला खलिस्तानसाठी चिथावणी देत आहे. भारत कायम अस्थिर रहावा यासाठी पाकिस्तान आपली शक्ती पणाला लावतो आहे. नुकतीच गोव्यात शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची शिखर परिषद झाली. यावेळी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला.
परिषदेच्या सुरुवातीला भाषण करताना पाकिस्तानचे नाव न घेता दहशतवादी कृत्यांसाठी केला जाणारा अर्थपुरवठा कोणत्याही भेदभावाविना थांबला पाहिजे आणि सीमापार होणाऱ्या दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबला पाहिजे, असे जयशंकर म्हणाले. दहशतवादाच्या मुद्याकडे दुर्लक्ष करणे एससीओच्या सदस्य देशांच्या सुरक्षिततेसाठी हानीकारक ठरेल यात शंका नाही. कारण दहशतवादाचे कधीही समर्थन केले जाऊ शकत नाही. परंतु पाकिस्तान, चीन आदी देशांनी कायम दहशतवादाचे समर्थन केले आहे, हे त्यांच्या कृतीतून दिसून आले आहे. सर्व देशांमधील दळणवळण प्रगतीसाठी आवश्यक असले तरी त्यासाठी सर्व सदस्य देशांची स्वायत्तता आणि प्रादेशिक अखंडता यांचा आदर केला गेला पाहिजे. या अपेक्षेसंदर्भात चीनची कृती काय दर्शवते? अरुणाचल प्रदेश संदर्भात चीनचा खोडसाळपणा साऱ्या जगाने पाहिला आहे. परिषदेला पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात भारतावर अप्रत्यक्ष टीका केली. काश्मीरचा मुद्दा अप्रत्यक्षपणे उपस्थित करताना आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होता कामा नये असे आवाहन त्यांनी केले. हे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा`सारखे झाले. मुत्सद्देगिरीत चढाओढीसाठी दहशतवादाचा हत्यार म्हणून वापर करू नये. दहशतवादासाठी लढा देताना सामूहिक दृष्टिकोन बाळगावा, हा जागतिक सुरक्षेला धोका असून त्याच्याशी लढा देण्यास पाकिस्तान कटिबद्ध असल्याचा दावा बिलावल यांनी केला. यालाच ‘सौ चुहे खाके बिल्ली हज चली` असे म्हणतात! पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुुत्तो यांचा दहशतवादाने बळी घेतल्याची आठवणही बिलावल यांनी करून दिली. या साऱ्या गोष्टींची पाकला चांगलीच कल्पना असेल तर नुकतेच पाकिस्तानात झालेल्या चार बड्या दहशतवाद्यांच्या हत्याकांडा संदर्भात पाकचे धाबे दणाणायचे कारण काय? पाकमध्ये एकानंतर एक अशा चार बड्या दहशतवाद्यांची अज्ञातांनी हत्या केल्यानंतर पाकची गुप्तचर संघटना आयएसआयची झोप उडाली म्हणे! खरे तर दहशतवाद्यांचा सफाया झाला हे चांगलेच झाले ते सोडून आयएसआयने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या सुरक्षेत वाढ केली म्हणे! दाऊदला स्पेशल कमांडोची सुरक्षा देण्यात आली असून त्याच्या निवासस्थानाच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली. म्हणजे तुम्हाला दहशतवाद्यांचा सफाया झाल्याचा आनंद साजरा करायचा आहे की दुखवटा? दाऊद इब्राहिम 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी असून तेव्हापासून तो पाकिस्तानच्या आश्रयाला आहे. तिथे बसून दाऊद भारतात आपले काळे धंदे चालवत आहे. 26/11 चा मुंबई हल्ला हे त्याचेच कारस्थान होय. पाकमध्ये खलिस्तानी कमांडो फोर्सचा प्रमुख परमजितसिंग पंजवार याची लाहोरमध्ये अज्ञात बंदूकधा-यांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्याआधी इंडियन एअरलाइन्सच्या विमान अपहरणाच्या बदल्यात सुटका करण्यात आलेला कुख्यात दहशतवादी जहूर मिस्त्रीची कराचीत हत्या करण्यात आली. काश्मीरमधील अल बद्र या दहशतवादी संघटनेचा माजी कमांडर खालिद रझा याचीही अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. हिजबुलचा दहशतवादी बशीर पीर रावळपिंडीत मारला गेला. असे एकामागून एक दहशतवादी मारले गेले तर आपले व्हायचे कसे याची चिंता पाकला लागली असेल! वास्तविक पाहता पाकिस्तानच्या दृष्टीने भ्रष्टाचार, लूटमार, महागाई आणि बेरोजगारी हाच खरा दहशतवाद असून त्याला आळा कसा घालायचा हाच चिंतेचा विषय आहे. दहशतवाद तर कायम त्यांच्या पाचवीला पूजलेला आहे. आता त्यात आणखी भर पडली ती माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेने. पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर नाट्यमयरीत्या अटक करण्यात आली. इस्लामाबादला एका खटल्याच्या प्रकरणी उच्च न्यायालयात त्यांची ‘बायोमेट्रिक` माहिती जमा केली जात असतानाच ‘रेंजर्स` या निमलष्करी दलाचे जवान काच तोडून आत घुसले आणि खान यांना खेचत गाडीत बसवल्याचा आरोप पीटीआयने केला आहे. इम्रान यांनी सोमवारी एका लष्करी अधिकाऱ्यावर आपल्याला जीवे मारण्यासाठी कट रचल्याचा आरोप केला होता. इम्रान यांच्यावर त्यांनी पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. पंतप्रधान असताना त्यांना ज्या वस्तू गिफ्ट म्हणून मिळाल्या त्या त्यांनी सरकारजमा केल्या नाहीत असा आरोप आहे. एखादे गिफ्ट त्यांना हवे असेल तर त्यांनी ते खरेदी करावे लागते. असे अनेक गिफ्ट त्यांनी स्वस्तात खरेदी केले आणि ते बाजारात विकून नफा कमावला असाही आरोप आहे. अटकेनंतर इम्रान म्हणाले, पाकिस्तानात मूलभूत हक्क आणि लोकशाहीचे दफन झाले आहे. मुळात लोकशाही आहेच कुठे? असा प्रश्न पडतो. त्यातले त्यात बरे म्हणजे, इम्रानखान यांची अटक बेकायदेशीर असून त्यांना तातडीने सोडण्याचे आदेश तिथल्या न्यायाधिशांनी गुरूवारी दिले आहेत.
पोसलेला भस्मासूर उलटतो तेंव्हा..












