पुणे | प्रतिनिधी
पिंपरी, दि.२१ : मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारला नुकतेच ९ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याद्वारे झालेल्या विविध लोक कल्याणकारी योजना, केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी पिंपरी विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाद्वारे “घर चलो अभियान” याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भारतीय जनता पक्ष मोदी @ ९ जनसंपर्क अभियान राबवत आहे.
मोदी @ ९ या उपक्रमामध्ये पिंपरी विधानसभा परिसरात व्यापारी संमेलन, सोशल मीडिया बैठक, जागतिक योग दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. २३ जून रोजी डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी बलिदान दिवस म्हणून साजरी केली जाते. ज्येष्ठ नागरिक संमेलन यांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच परिसरातील प्रबुद्ध व्यक्तींचे संमेलन २५ जून रोजी आयोजित करण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्ष यांच्या भाजप संघटन समितीद्वारे पिंपरी विधानसभेतील ३९९ बुथ वर जाऊन मोदी सरकारची गेल्या नऊ वर्षात झालेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्य सरकारच्या “शासन आपल्या दारी” या विशेष उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे अशी माहिती पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी दिली.आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजप संघटन द्वारे विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या भारतीय जनता पक्ष जाणून घेणार आहे. तसेच अपूर्ण राहिलेली कामे जलद गतीने पूर्ण व्हावी यासाठी प्रशासकीय अधिकारी व शासन यांच्या मदतीने प्रयत्न केले जातील असे मत आमदार उमा खापरे यांनी व्यक्त केले आहे.
येणाऱ्या काळात पिंपरी विधानसभेतील भाजपचे आजी-माजी सर्व नगरसेवक आघाडी मोर्चा पदाधिकारी,बूथ कार्यकर्ते सर्व संघटित होऊन केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार आहेत. तसेच जनता व सरकार यांच्या मधला दुवा होऊन विकास कामांना गती देण्याचे काम करणार आहेत अशी माहिती प्रदेश कार्यकारी सदस्य सदाशिव खाडे यांनी दिली.
मोदी @ ९ जनसंपर्क अभियान याद्वारे मोदी सरकारची विकास कामे आणि कल्याणकारी योजनांचे तपशील आपल्याला पाहायला मिळणार आहे. यामध्ये अंत्योदय हेच ब्रीदवाक्य,सशक्त शेतकरी समृद्ध भारत,भारतातील अमृत पिढी सक्षम बनते,नारी तू नारायणी महिला सक्षमीकरण,निरोगी जीवन प्रत्येकाचा हक्क,मध्यमवर्गीय जीवन सोपे झाले,सक्षम भारत,पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास,ईशान्येकडील राज्यांचा ऐतिहासिक विकास,सांस्कृतिक वारसाचे नवीन युग इत्यादी योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्ष यांनी आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेत पिंपरी विधानसभा भाजपा निमंत्रित सदस्य महाराष्ट्र विधान परिषद आमदार सौ.उमा खापरे ,भाजपा कार्यकारणी सदस्य सदाशिव खाडे, निवडणूक प्रमुख पिंपरी विधान सभा अमित गोरखे, विशेष निमंत्रित सदस्य महाराष्ट्र राज्य राजेश पिल्ले, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष अनुप मोरे, सरचिटणीस राजू दुर्गे, माजी उपमहापौर नानी ( हिराबाई ) गोवर्धन घुले, महिला मोर्चा अध्यक्ष उज्वला गावडे, नगरसेवक केशव घोळवे, अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर,माऊली थोरात, शितल शिंदे, शैलेश मोरे, मंडल अध्यक्ष विजय शिनकर, महेंद्र बाविस्कर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.












