तरुणीने आपल्यासोबत लग्न करावे यासाठी एकाने तिला धमकी देत तिचे अपहरण करुन त्याच्या गावी घेऊन गेला. त्याठिकाणी तरुणीला डांबून ठेवून तिच्याकडे लग्नासाठी जबरदस्ती केली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार २१ डिसेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास इन्फोसिस प्रा. लि. कंपनी जवळ घडला होता. याबाबत मुलीने हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी निलेश तुकाराम बुरुटे (रा. शेगाव, ता. जत. जि. सांगली) याच्यावर ३४२, ३६६ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी मुलीला ‘तु माझ्याशी लग्न करण्यासाठी माझ्या बरोबर चल, तु नाही आलीस तर तुझे फोटो व्हायरल करेन, तुझ्या घरच्यांना सांगेन’ अशी धमकी दिली. त्यानंतर मुलीने त्याला समजावून सांगितले. मात्र आरोपीने तिच्याकडे लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली. त्यानंतर निलेश याने त्याच्या चारचाकी गाडीतून मुलीला जबरदस्तीने त्याच्या शेगाव या मुळ गावी घेऊन गेला. त्याठिकाणी मुलीला घराच्या खोलीत डांबून ठेवले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके करीत आहेत.












