पुणे शहरात दिसोंदिवस महिला अत्याचाराचे प्रकारांमध्ये वाढ होत चालली आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनाने महिला सुरक्षा व महिलेंना सशक्त करण्यासाठी काही ठोस पाऊले उचलावीत अशी मागणी सर्व स्तरांवरून केली जात आहे. नुकताच असाच एक धक्कादायक व निंदनीय प्रकार कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे. अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करुन एका नराधमाने तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यातून पीडित १५ वर्षीय तरुणी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या घराजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी २०२३ ते ऑगस्ट २०२३ या दरम्यान कोंढवा खु. येथे घडला आहे.
याबाबत पीडित १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन मनोज (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्यावर भा.दं.वि. कलम ३७६, ३७६/२/एन, ५०६ सह पोक्सो अॅक्ट नुसार कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज हा पीडित तरुणीच्या घरा शेजारी असणाऱ्या मामीच्या घरात भाड्याने राहतो. आरोपीने मुलीसोबत ओळख करुन तिच्यासोबत मैत्री केली. मुलगी घरात एकटी असताना आरोपी घरात आला. त्याने मुलीला जवळ बोलावून घेत ‘तुला माझ्या सोबत राहायचे आहे की नाही’ असे विचारले. त्यावेळी मुलीने त्याला नकार दिला. आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील त्याने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर आपले भांडण होईल अशी धमकी देऊन तीन ते चार वेळा शारीरिक संबंध ठेवले. पीडित तरुणी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.












