पुणे : दिवसेन दिवशी पुण्यातील गुणेगारी वाढत आहे. पुण्यात एक धक्का दायक प्रकार समोर आला मानसिक विकाराने ग्रस्त असलेल्या मुलाला बरे करण्याचे आमिष दाखवून आणि जादूटोण्याची भीती घालून महिलेची 35 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.तसेच नरबळी द्यावा लागेल, असे सांगून आरोपींनी महिलेकडे आणखी 50 लाख रुपये मागितले. आरोपींनी जादूटोण्याची भीती दाखवल्याने घाबरलेल्या महिलेने आत्महत्या करण्याच प्रयत्न केला. मात्र त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार केली आणि याप्रकरणी पोलिसांना पाच जणांविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पुण्यातील चंदरनगर भागात राहते. तिचा मुलगा मानसिक विकाराने ग्रस्त आहे. त्यामुळे मुलाला मानसिक विकारातून बरे करणे आणि कौटुंबिक अडचणी सोडवण्याचे आमिष दाखवून आरोपींनी महिलेकडून वेळोवेळी 35 लाख रुपये उकळले. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी महिलेला नरबळी द्यावा लागेल, असे सांगून आणखी 50 लाख रुपयांची मागणी केली. तसेच नरबळी न दिल्यास कुटुंबाचा सर्वनाश होईल, पती आणि मुलाचा मृत्यू होईल, अशी भीतीही महिलेच्या मनात भरली.
आरोपींनी जादूटोण्याची भीती दाखविल्याने महिला घाबरली आणि तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. पण सुदैवाने ती बचावली आणि तिने चंदरनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर सहायक पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी आरोपींना अटक केली आहे. चारुदत्त संजय मारणे (31, रा. आंबेगाव), पूनम घनश्याम कोहंडे (38), नीलम राहुल जाधव (35, रा. कर्वेनगर), देविका अमित जुन्नरकर (30, रा. कोथरुड), संतोष मारुती येनपुरे (45, रा. वारजे माळवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.












