पुणे : तरुण गप्पा मारत बसले असताना त्यांना ‘तुम्ही गांजा विक्री करता’ असे सांगून पोलीस केस करायची नसेल तर त्या बदल्यात पैशे दयावे लागेल अशी मागणी काही लोकांनी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांच्या अंगावर पुड्या टाकून त्याचे व्हिडिओ रेकॉडिंग करत त्यांना मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत वडगाव शेरी येथे राहणार्या एका २६ वर्षाच्या तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ४०/२४) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी २ पुरुष व २ महिलांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मुंढवा रोडवरील गणेश पार्क येथे १९ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र गप्पा मारत बसले होते. त्यावेळी २ पुरुष व २ महिला तेथे आला. त्यांनी फिर्यादी यांना तुम्ही गांजा विक्री करता असे खोटे बोलून जर पोलीस केस करावयाची नसल्यास त्याबदल्यात पैशांची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांनी त्यांच्याजवळील कसल्यातरी पदार्थाच्या पुड्या फिर्यादीच्या अंगावर टाकल्या. फोनमध्ये व्हिडिओ रेकॉडिंग करुन त्याआधारे फिर्यादी विरुद्ध पोलिसांकडे खोटी केस करण्याची परत भिती घालून अधिक पैशांची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांनी दमदाटी करुन हाताने मारहाण केली. चंदन नगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक माने पुढील तपास करीत आहेत.












