मुंबई : मराठा समाज आरक्षणासाठी आर – पारची लढाई पुकारणारे मनोज जरांगे-पाटलांच्या लढाईला अखेर यश आले आहे. सरकारकडून जरांगे-पाटलांच्या सर्व मागण्या आता मान्य करण्यात आल्या आहेत. सरकारकडून अध्यादेश काढत मागण्या मान्य झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता हा अध्यादेशच नाही, केवळ एक सरकारी नोटिफिकेशन आहे, असे मंत्री छगन भुजबळांनी म्हटले आहे. यामुळे आता पुन्हा गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
अध्यादेश काढून सरकारने जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या, असे समजताच मुंबईत मराठा समाजाचा जल्लोष सुरू झाला. एकीकडे हा जल्लोष सुरू असताना सरकारने काढलेले पत्रक अध्यादेशच नसल्याचे म्हणत भुजबळांनी खळबळ उडवून दिली. भुजबळ म्हणाले, “जे काही पत्र निघाले आहे, तो अध्यादेशच नाही. हा केवळ नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे. हा कसला अध्यादेश? या मसुद्यावर 16 तारखेपर्यंत जे आक्षेप नोंदवायचे आहेत, त्यानंतर यावर काय निर्णय घ्यायचा, हे शासन ठरवणार आहे. ते जर शासनपातळीवर ठरलं तर कोर्टात याला आव्हान देता येईल. तोपर्यंत यावर आमचा अभ्यास सुरू राहील.”












