आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शहर भाजपच्या वतीने 4 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत बूथ चलो अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष धीरज घाटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
घाटे म्हणाले, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सुचनेनुसार पुणे लोकसभा मतदारसंघातील दोन हजार दहा बूथवर हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक बूथसाठी एक प्रवासी कार्यकर्त्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणुकीपर्यंत दर पंधरा दिवसांनी हा कार्यकर्ता बूथवर भेट देणार आहे. केंद्र शासन आणि राज्य सरकारची विकासकामे आणि योजना या अभियानाअंतर्गत मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. शहर सरचिटणीस रवी साळेगावकर आणि सुभाष जंगले यांची या अभियानाच्या संयोजक म्हणून नियक्ती करण्यात आली आहे.
घाटे म्हणाले, बूथ समितीची बैठक घेणे, बूथ समिती आणि पन्ना प्रमुख यांना त्यांच्यावरील जबाबदाऱ्या सोपवणे, नवीन मतदार नोफ्लदणी, मतदार यादीचा आढावा, व्हॉटसॲप ग्रुप तयार करणे, विकसित भारतसाठी ब्रँड ॲबँसिडर बनविणे, प्रचार मोहिमेचा आढावा घेणे, प्रत्येक बूथवर 51 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळविण्याचे नियोजन करणे, ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे, प्रभावशाली व्यक्तिंची भेट घेणे, लाभार्थ्यांशी संवाद साधणे, विविध समाज घटकांच्या बैठका घेणे अशाप्रकारची कामे या अभियानातून करण्यात येणार आहेत.या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर, सुभाष जंगले, राघवेंद्र मानकर,महेश पुंडे, संजय मयेकर,पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले आदी उपस्थित होते घाटे पुढे म्हणाले, पुणे लोकसभेची बूथ समितीची रचना पूर्ण झाली असून 2010 बूथ प्रमुख, 731 सुपर वॉरियर्स, 472 शक्ती केंद्र प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.












