उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख व माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. जमिनीचा वाद आणि आपसांतील वैमनस्य यातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबारात शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील नेते आणि कार्यकर्ते जमले होते. यावेळी पोलीस निरीक्षकांच्या दालनात या दोन नेत्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला.
कल्याण तालुक्यातील द्वारली गावातील जाधव कुटुंबांची जमीन गणपत गायकवाड यांनी विकत घेतली होती. गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हे काल त्या जमिनीवर कंपाऊंडचे काम सुरु असल्याने पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र, त्या ठिकाणी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड त्या जागेवरती गेले. जागेवर सुरु असलेलं काम पाडण्यास सुरुवात केली. हा वाद त्या ठिकाणी सुरु असताना आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव याने वडिलांना फोन करुन याबाबत सांगितले. त्यामुळे हा वाद पोलीस ठाण्यात पोहचला.
हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या केबीनमध्ये या वादाबाबत आमदार गणपत गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्याचा सहकारी राहुल पाटील हे पोलिसांसमोर मत मांडत होते. त्यावेळी दोन्ही गटात वाद होऊन गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. गायकवाड यांनी पाच ते सहा राऊंड फायर केले. यामध्ये महेश गायकवाड यांना चार तर राहुल पाटील यांना दोन गोळ्या लागल्या आहेत. हा प्रकार शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास घडला. यापूर्वीही महेश गायकवाड व आमदार गणपत गायकवाड यांच्यात हाणामारी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गणपत गायकवाडांसह ५ जणांवर गुन्हा दाखल
दरम्यान या गोळीबाराप्रकरणी गणपत गायकवाडांसह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे मात्र आणखी तिघे अद्याप फरार आहेत. आरोपी नागेश बाडेकर, वैभव गायकवाड आणि विकी गणित्रा या फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या हल्ल्या प्रकरणी गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाडलाही यात आरोपी बनवण्यात आलं आहे. आरोपींवर हत्येचा प्रयत्न आणि कट रचण्याचा गुन्हा दाखल आहे.












