मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत असून काही दिवसांत आरक्षणाच्या कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्यासंदर्भात आपली भूमिका अधिक आक्रमक केली आहे. आपण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा खळबळजनक खुलासा त्यांनी एका जाहीर सभेतच केल्यामुळे त्यावरून सत्ताधारी पक्षांमध्ये बैठकसत्र सुरू झालं आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसत असल्याचं जाहीर केलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २७ जानेवारी रोजी वाशीमध्ये पोहोचलेल्या मराठा आंदोलकांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागण्या मान्य केल्याचं जाहीर केलं. तसेच, इतर कोणत्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तडीस लागत असताना दुसरीकडे सोशल मीडियावरून मरोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनामुळे काय फायदा झाला? असा प्रश्न काही युजर्सकडून विचारण्यात येत आहे. त्यावर आज मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना उत्तर दिलं.
सोशल मीडियावर बोलणाऱ्या काही लोकांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील काही नेत्यांकडून माझ्याविरोधात बोलण्याची सुपारी घेतली आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला. “महाराष्ट्रातील काही १०-२० जणं सरकारी व विरोधी पक्षांची सुपारी घेऊन सलग बोलत राहतात. आंदोलनातून काय मिळालं, काय नाही मिळालं असं ते सोशल मीडियावर विचारत असतात. पण हा लढा त्यांच्यासाठी नाहीये. हा लढा मराठा समाजासाठी आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षातले लोक जाणून-बुजून बोलतायत. जर ते इथून पुढे गप्प बसले नाहीत, तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्यासह नावं जाहीर करेन”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.












