सौदी अरेबिया येथे शासकीय एजंट असल्याची बतावणी करुन २० हजार सोलर पॅनलचे टेंडर देण्याचा बहाणा करुन एकाने व्यावसायिकाला २६ लाख ५५ हजार १४१ रुपयांना गंडा घातला.याबाबत महादेव बलभीम शिंदे (वय ५४, रा. सिंहगड रोड, पर्वती) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ६८/२४) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी व्हॉटसअॅप कॉलर व बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने व्हॉटसअॅप व ई मेल द्वारे संपर्क साधला. फिर्यादी यांच्या कंपनीच्या मेल आयडीवर संपर्क साधला. तो सौदी अरेबिया मधील सौदी अरेबिया पब्लिक प्रोक्युमेट अॅथोरिटी मधील अधिकृत एजंट असल्याची बतावणी केली.
त्यांच्याकडे २० हजार सोलर पॅनलसाठी गर्व्हमेंट टेंडर असल्याचे सांगितले. हे टेंडरच्या बहाण्याने फिर्यादी यांना रजिस्ट्रेशन फी, टेंडरची प्रोसेसिंग फि व अॅक्सेप्टन्स, अॅडवान्स रक्कम, लिगलायझेशन आणि स्टॅम्प ड्युटी व फंड रिलीज ऑडर वर सही करण्यासाठी अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले. टेंडर मिळण्याच्या आशेने त्यांनी पैसे पाठविले. त्यांना खोटी कागदपत्रे पाठवून फिर्यादीच्या कंपनीला कोणत्याही प्रकारची टेंडर न देता २६ लाख ५५ हजार १४१ रुपयांची फसवणूक केली. पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर तपास करीत आहेत.












