पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडून निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याच्या आम आदमी पार्टीच्या तक्रारीची मुख्य निवडणूक निर्णय अधिका-यांनी दखल घेतली आहे. नगरविकास प्रधान सचिव आणि सामान्य प्रशासन अपर मुख्य सचिव यांना तक्रारीची पडताळणी करुन आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
आम आदमी युवक पक्षाचे माजी शहराध्यक्ष रविराज काळे यांनी १ फेब्रुवारी २०२४ रोजी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याबाबत केलेल्या तक्रारीची भारत निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल घेतली आहे.
या अर्जानुसार महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे उपमुख्य निवडणूक अधिकारी योगेश गोसावी यांनी १६ फेब्रुवारी २०२४ रोजी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांना पत्र पाठविले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन न करता निवडणूकीचे काम पाहणा-या सहायक आयुक्त आणि प्रशासन अधिकारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांना तीन वर्ष कालावधी झालेल्या अधिका-यांची बदली न केल्याने महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांनी सदरील तक्रार अर्जाची तात्काळ तपासणी करुन आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी योगेश गोसावी यांनी दिले आहेत.












