पिंपरी – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथील सभेत केला अमित शहांवर घणाघात. म्हणाले “मणिपूर पेटले असताना त्यांची तिकडे जाण्याची हिंमत नाही. तिकडे शेपूट घालणारे गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावर फणा काढून गेले. मविआ म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे, असे ते म्हणाले. आमची रिक्षा पंक्चर झाली असेल कारण ती साध्या माणसांची रिक्षा आहे. पण तुमच्या ट्रिपल इंजिन सरकारला भ्रष्टाचाराची चाकं लागली आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले, इतर पक्षाप्रमाणे आमचे आमदार-खासदार फोडले की शिवसेना संपेल असे भाजपाला वाटले असेल. पण शिवसेना तशी संपणार नाही. शिवसेना भाजपाला गाडून, मूठमाती देऊन पुढे जाईल. पण शिवसेना संपणार नाही. उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपाचे नेते म्हणतात, आम्ही मोदींचे फोटो लावून जिंकलो. पण धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आठवण करून दिली की, मोदी नाव कुणाला माहीत नव्हते, तेव्हाही आम्ही धाराशिव जिंकत होतो. भाजपाला आणि मिंधे गटाला आमचे नेते, वडील चोरण्याची वेळ आली आहे. माझे वडील चोरण्याचा प्रयत्न केला तरी यांना हिंदूहृदयसम्राट होता आलेले नाही.
उद्धव ठाकरे म्हणाले, यावर्षी मे-जूनमध्ये मोदींना माजी पंतप्रधान म्हणावे लागेल.
मोदी-शाह यांची रेकॉर्डिंग अडकली आहे. तेच तेच वाक्य ते पुन्हा बोलत आहेत. निवडणूक रोख्यांचा गैरव्यवहार आता समोर आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियातून जर शेतकऱ्यांनी कर्ज घेतले असेल तर त्या कसे मागे लागतात, हे सर्वांनाच माहीत आहे. जप्तीच्या नोटीसा लावतात, घरदार सर्व गहाण ठेवतात.
कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतो. एवढे सगळे रेकॉर्ड बँक ठेवू शकते.
मग हजारो कोटींची उलाढाल असलेला निवडणूक रोख्यांचा तपशील बँकेकडे नाही?
सर्वोच्च न्यायालयाने तपशील उघड करण्याचे आदेश देऊनही बँकेने तीन महिन्यांचा वेळ मागितला आहे. सामान्य शेतकऱ्यांचा रेकॉर्ड ठेवता, तसे या चोरांचे रेकॉर्ड बँकेकडे कसे नाही? असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.












