पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २४ : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ते मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांनी 100 हून अधिक मराठी नाटके केली आणि वेगवेगळ्या हिंदी चित्रपटांमध्ये 30 हून अधिक पात्रे साकारली आहेत. त्यांच्या निधनाने संपूर्ण मराठी बांधव दु:खी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र अखेर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जयंत सावरकर हे ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. जयंत सावरकर मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये दिसले आहेत. जयंत सावरकर यांचा जन्म ३ मे १९३६ रोजी गुहागर येथे झाला. जयंत सावरकर यांनी वयाच्या विसाव्या वर्षी मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. त्यांची अनेक नाटके लोकप्रिय झाली आहेत. ‘अपराध मीच केला’ (गोळे मास्टर), ‘अपरांक,’ ‘अलिबाबा चालीस चोर,’ ‘अलाद्दीन जादूचा दिवा,’ ‘आम्ही जगतो बेफाम,’ ‘एकच प्याला’ अशा अनेक नाटकांसाठी ते प्रसिद्ध आहेत.












