पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.३१ : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून कृषी विभागाच्यावतीने 30 ऑगस्ट रोजी साखर संकुल येथे कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांच्या उपस्थितीत शेतकरी दिनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, सा.बां.विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, संचालक फलोत्पादन कैलास मोते, संचालक (विप्र) दिलीप झेंडे, संचालक आत्मा दशरथ तांबाळे, पोपट शिंदे, विनयकुमार ओटी, पांडुरंग शेळके, सुनिल बोरकर, कृषि सहसंचालक (विप्र) शशीकांत म्हेत्रे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात श्री. चव्हाण यांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांकरिता केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून ‘शेतकरी दिन’ साजरा करण्यात येतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी श्री. बागडे व श्री. औटी, यांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांकरिता केलेल्या कार्याबाबत माहिती दिली.












