पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०३ : पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या बांधकाम मजुराच्या डोक्यात एकाने लोखंडी रॉडने वार केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. ही घटना वाघोली येथील केसनंद फाटा परिसरात घडली.
तुळशीराम एस. (वय ४०) असे जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे. याबाबत नेत्रकुमार परदेस निषाद (वय ३७) याने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी मुरली जेठुराम निषाद (वय ३३, रा. केसनंद फाटा, वाघोली) याला अटक केली आहे. हे तिघेही बांधकाम मजूर असून, मूळचे छत्तीसगड येथील रहिवासी आहेत. केसनंद फाटा येथील संत तुकाराम नगर परिसरातील एका गृहप्रकल्पाच्या आवारात राहतात.
शनिवारी आरोपी मुरलीचे पत्नीशी भांडण सुरू होते. त्यावेळी तुळशीरामने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुरलीने ‘तू आमच्या भांडणात का पडला’ असे म्हणत तुळशीरामच्या डोक्यात रॉडने वार केले. त्यात गंभीर झाल्याने तुळशीरामला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.












