पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०२ : दहशत माजवणाऱ्या अटल गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. ही घटना अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
या प्रकरणी नरेंद्र उर्फ छोट्या महादेव बलकवडे ( वय ३२, रा. मेहंदळे गॅरेज समोर, गणेश नगर, एरंडवणे, पुणे ) या आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत चाकू, कोयता, सुरे यासारख्या जीवघेण्या हत्यारां सह खुनाचा प्रयत्न, विनयभंग, दुखापत, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यांसारखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.मागील पाच वर्षात त्याच्याविरुद्ध सहा गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार यांच्या आदेशावरून श्री. राजेश तटकरे ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अलंकार पोलीस स्टेशन पुणे ) यांच्या अधिपत्याखाली आरोपीस एम. पी. डी. ए कायद्यांतर्गत नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे एका वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे.












