जुन्या भांडणाच्या रागातून तीन जणांनी एका अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
हा प्रकार खडकी बाजार मधील दर्ग्याजवळ मंगळवारी घडला. याबाबत फरदीन शब्बीर शेख (वय-17 रा. इंदिरानगर वसाहत, गणपती मंदिराजवळ, खडकी) याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अरबाज जाफर शेख (वय-21), अब्दुल रहेमान मोहम्मद कुट्टी (वय-44), तरबेज अब्दुल रहेमान कुट्टी (वय-20 तिघे रा. रा. महादेववाडी, खडकी) यांच्यावर आयपीसी 307, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याचा मित्र मुद्दसीर मतीन शेख (वय-17 रा. डेपो लाईन, खडकी बजार) याचे आरोपींसोबत भांडण झाले होते. याच भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता.मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास फिर्य़ादी खडकी बाजार येथील दर्ग्याजवळ थांबला होता.
त्यावेळी आरोपींनी जुन्या भांडणाच्या रागातून फिर्यादी याला जीवे मारण्याच्या उद्देशाने दगड डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. जखमी मुलाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत












