पुणे प्रतिनिधी
पुणे २५ : ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सनेसंगीत-नृत्यादी कला प्रकारातील गुरू-शिष्यांना एका मंचावर आणण्याचा ‘परंपरा’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. या ‘परंपरा’ श्रृंखलेतील दुसरे पुष्प येत्या रविवारी ज्येष्ठ कथक नृत्यगुरू शमा भाटे सहकलाकारांसह गुंफणार आहेत. गुरूंकडून कलेचा प्रवास शिष्याकडे कसा प्रवाहित होतो याची अनुभूती या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसिकांना घेता येणार आहे.
कार्यक्रम रविवार, दि. 30 जुलै 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, प्लॉट नं. 17, वेद भवन मागे, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे. नृत्यगुरू शमा भाटे यांच्यासह अमिरा पाटणकर, अवनी गद्रे, भार्गवी सरदेसाई, ईशा नानल, श्रद्धा मुखडे, श्रीया कुलकर्णी, प्रचिती भावे, प्रमोद वाघ यांचा कार्यक्रमात सहभाग असणार आहे. चारुदत्त फडके (तबला), सुरंजन खंडाळकर (गायन), अनिरुद्ध जोशी (सितार), यशवंत थिट्टे (हार्मोनियम), अनुप कोल्हे (व्हायोलिन) यांची साथसंगत असणार आहे.
कलेच्या क्षेत्रातील गुरू-शिष्य परंपरेचा वारसा रसिकांना समजावा, गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित व्हावे या उद्देशाने ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे ‘परंपरा’ ही श्रृंखला सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सचे प्रमुख प्रवीण कडले यांनी दिली. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.












