पुणे प्रतिनिधी
पुणे दि 25 : गुरू बा. शं. उपाध्ये यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि उपाध्ये व्हायोलिन वादन विद्यालयाच्या सप्तदशक पूर्तीनिमित्त शनिवार, दि. 29 जुलै रोजी व्हायोलिन वादनाची मैफल तसेच ‘फाउंडेशन ऑफ म्युझिक’ या शालेय विद्यार्थी तसेच अभ्यासकांना उपयुक्त ठरेल अशी मांडणी असलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात कार्यक्रम होणार असून पहिल्या सत्रात सकाळी 9:30 वाजता अंजली सिंगडे-राव यांचे व्हायोलिन वादन होणार असून त्यांना डॉ. अतुल कांबळे तबलासाथ करणार आहेत. जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये आणि कवी, लेखक डॉ. अरविंद दामले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘फाउंडेशन ऑफ म्युझिक’ या अभ्यासपूर्ण पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दुसऱ्या सत्रात आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध शास्त्रीय गायक डॉ. पंडित विकास कशाळकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार असून प्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे हे प्रमुख अतिथी आहेत. महाराष्ट्र राज्य संगीत शिक्षक संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर चिंचोले, संघटनेचे कार्यकारिणी सदस्य रमाकांत पैंजण यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
नव्या शैक्षणिक धोरणात संगीतविषयक शिक्षण अनिवार्य असणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होण्याआधीपासून म्हणजे व्हायोलिन अकॅडमीच्या पुढाकाराने 2017 पासून शालेय विद्यार्थ्यांना गायन-वादनाची प्रात्यक्षिकासह प्राथमिक माहिती देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तीन हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना संगीतविषयक प्राथमिक ज्ञान देण्यात आले आहे. गायन, वादन, नृत्य यांच्या मिलाफातून संगीत निर्माण होते. याच अनुषंगाने पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असल्याचे पंडित अतुलकुमार उपाध्ये यांनी सांगितले.












