शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने राज्यासह देशभरातून तसेच विदेशातून शिवभक्त किल्ले शिवनेरी येथे येत असतात. शासकीय सोहळा संपन्न झाल्याशिवाय या शिवभक्तांना किल्ले शिवनेरी येथे प्रवेश दिला जात नाही.
त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांनी ही सूचना केली होती. त्यानुसार यावर्षी सकाळी लवकर शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.दरवर्षी किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सवाचा सोहळा सकाळी दहा वाजता सुरू होतो.
राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवजन्मोत्सवाचा पाळणा हलवून हा शासकीय शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न होतो. सन २००० पासून या शासकीय सोहळ्याला सुरुवात झाली आहे. सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री किल्ले शिवनेरी येथे हेलिकॉप्टर मधून दाखल झाले. त्यानंतर ते शिवजन्मोत्सव ठिकाणी पोहोचले. तिथे शिवजन्मोत्सवाचा पाळणा झाल्यानंतर ते पालखीच्या ठिकाणी आले. पालखीला वंदन केल्यानंतर पोलीस पथकांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली. बाल मावळ्यांनी साहसी खेळांचे प्रात्यक्षिक दाखवले.
हा शासकीय सोहळा सुरू असताना शिवनेरीच्या पायथ्याशी अबालवृद्धांनी गर्दी केली. शासकीय सोहळा संपन्न झाल्यानंतर या सर्व शिवभक्तांना शिवनेरी गडावर सोडण्यात आले. दरम्यान, शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सवानिमित्त फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.