पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
दि. २८ : दुपारच्या सुमारास रावेत पोलीस स्टेशनच्या हद्दीत किवळे येथील लीगसी इंपीरियर या बांधकाम साइटवर काम करत असलेल्या एका मजुराचा मटेरियल लिफ्टच्या विजेचा झटका लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
रघुनंदन हा मूळ जिल्हा छत्तीसगड याठिकाणी राहणारा ३७ वर्षीय मजूर किवळे येथील लीगसी इंपीरियर या बांधकाम साइटवर पाचव्या मजल्यावर काम करत असताना त्याला मटेरियल लिफ्टला हात लावला असता त्याला विजेचा झटका लागून तो खाली पडला. तिथे जवळच असलेल्या आसपासच्या मजुरांनी तिसऱ्या मजल्यावर काम करत असलेल्या त्याच्या भावाला बोलावले, भावाने पाहिलं तेव्हा रघुनंदन बेशुद्ध अवस्थेत खाली पडला होता. त्याने तात्काळ सुपरवायझर व ठेकेदारला संपर्क साधला.
सुपरवायझर ठेकेदार आल्यानंतर रघुनंदन याला ऑटो रिक्षामध्ये टाकून देहूरोड येथील आधार हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले व त्याला शवविच्छेदनासाठी वायसीएम या सरकारी रुग्णालयामध्ये पाठवून दिले, अशी माहिती मयतच्या भावाने दिली.
‘इमारत बांधकाम मजुरांना सुरक्षित साधने न दिल्याने अनेक कामगारांचे जीव गेलेले आहेत. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता हा कायदा जरी असला तरी त्या कायद्याची अंमलबजावणी जाणीवपूर्वक केली जात नाही.
सुरक्षेच्या कारणाने मृत्यू झालेल्या बांधकाम कामगारांच्या मृत्यूला जबाबदार त्या ठिकाणच्या ठेकेदार आणि विकासकाला धरलं पाहिजे आणि तसे गुन्हे त्यांच्यावर नोंद केले पाहिजेत, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी केली आहे.
घडलेल्या प्रकाराबाबत रावेत पोलीस काय कारवाई करणार? ठेकेदार व विकासक यांच्यावर गुन्हा दाखल दाखल होणार की नाही? त्या मजुराला योग्य तो न्याय मिळणार की नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.












