पुणे | प्रतिनिधी
पावसाच्या कमतरतेमुळे साखर उत्पादनात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान सणासुदीच्या काळात साखरेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ही दोन्ही कारणे लक्षात घेता केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर काही निर्बंध घालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढल्यामुळे सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचे आदेश जारी करू शकते.
साखरेच्या किमती वाढल्यानंतर सरकारने साखर कंपन्यांना १० ऑक्टोबर २०२३ पर्यंत उत्पादन, डिस्पॅच, डीलर, किरकोळ विक्रेता आणि विक्रीचा संपूर्ण डेटा देण्याचे आदेश दिले होते. तसे न केल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील दिला होता. तसेच सरकारने साखर कारखान्यांना १० नोव्हेंबरपर्यंत NSWS पोर्टलवर नोंदणी करण्यास सांगितले आहे.












