पिंपरी- “दि पुणे फॅमिली कोर्ट लायर्स असोसिएशन” तर्फे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय अभय ओक तसेच न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. दि पुणे फॅमिली कोर्ट लायर्स असोसिएशन चे अध्यक्ष एडवोकेट वैशाली चांदणे व त्यांच्या कार्यकारणीच्या वतीने हा छोटासा सत्कार समारंभ पार पडला.
काल मोशी न्यायालयाच्या नवीन इमारतीचा मोशी येथील पेठ क्रमांक 14 मध्ये भूमिपूजन संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी न्यायाधीश भूषण गवई बोलत होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक, न्यायाधीश प्रसन्न वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय, न्यायाधीश तथा पुणे पालक न्यायाधीश रेवती डेरे, न्यायाधीश संदीप मारणे, न्यायाधीश आरिफ डॉक्टर, पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन, पिंपरीचे न्यायाधीश राजेश वानखेडे, पिंपरी-चिंचवड अॅड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड रामराजे भोसले पाटील, आमदार महेश लांडगे, यासह प्रशासकीय, पोलीस, विधी विभागातील प्रमुख अधिकारी या सर्वांनी उपस्थिती लावली होती.
पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे. त्यामुळे इथे औद्योगिक न्यायालय होणे गरजेचे आहे. ते आता ही इमारत झाल्यावर होणार आहे. आपल्याकडे विवाह विषयक वादांचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यासाठी देखील स्वतंत्र न्यायालय होईल. दिवाणी, फौजदारी, सत्र आणि जिल्हा न्यायालये ही खरी न्यायालये आहेत. ती सुदृढ करण्यासाठी आपण जोर दिला पाहिजे. या न्यायालयांना योग्य ती साधने मिळाली पाहिजेत. नगर, बीड, कोल्हापूर येथील न्यायालयांच्या माध्यमातून आधुनिक न्यायालये उभारण्यासाठी प्रयत्न झाल्याचे दिसते. मोशी येथे होणारी इमारत देखील अत्याधुनिक असेल. असे मत न्यायमूर्ती अभय ओक यांनी मांडले.
दरम्यान, यावेळी बोलतांना न्यायालयाच्या इमारतीचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी वकील संघटनांनी सातत्याने प्रयत्न करावेत. न्यायालयाच्या इमारतीच्या परिसरात चांगली झाडे लावली पाहिजेत. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल तसेच पक्षकारांना बसण्यासाठी चांगली जागा उपलब्ध होईल. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाचला पाहिजे, याकडे लक्ष द्यायला हवे. असेही न्यायमूर्ती अभय ओक म्हणाले.