पुणे- पुणे पोलिसांनी कुरकुंभ येथील एम.डी. हा अंमली पदार्थ बनविणारा कारखाना उघडकीस आणला. तेथून देशापरदेशात एमडी पुरविले जात असल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतामध्ये अफुची लागवड केली जात असल्याचा दुसरा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
किरण कुंडलीक जगताप (वय ४०) व रोहिदास चांगदेव जगताप (वय ५५, रा. कोडीत, ता. पुरंदर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ग्रामीण पोलिस दलाचा कार्यभर स्वीकारल्यानंतर अंमली पदार्थाचे उत्पादन, साठा, विक्री सेवन करणार्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. जेजुरी पोलिस ठाण्याच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत मावडी मध्ये शेतात विनापरवाना अफुची लागवड करुन उत्पादन घेतले जाते अशी बातमी मिळाली. त्यानुसार जेजुरी व भोर पोलीस ठाण्यातील पोलिस अधिकारी मावडी गावातील जगताप मळ्यातील कवठीचा मळा येथे गेले. तेथील दोन वेगवेगळ्या शेतात जावून पाहणी केली असता तेथे बेकायदेशीर विनापरवाना अफुची लागवड केलेली दिसून येऊ नये, म्हणून कांदा व लसुण पिकाची लागवड करण्यात आली होती. ७६ हजार ५६० रुपयांचे ३८.२८ किलो वजनाची अफुची झाडे जप्त करण्यात आली आहे.
पाच दिवसांपूर्वी पुरंदर तालुक्यातील कोडीत गावात स्थानिक गुन्हे शाखेने विनापरवाना अफुची लागवड केलेल्या दोघांवर कारवाई केली होती.
पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय अधिकारी श्रीकांत पांडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आण्णासाहेब पवार, जेजुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, नामदेव तारडे, पोलिस अंमलदार विठ्ठल कदम, शुभम भोसले, तात्यासाहेब खाडे, दशरथ बनसोडे, भानुदास सरक यांनही ही कामगिरी केली.












