अशोक चव्हाण यांनी काल सकाळी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. चव्हाण यांनी काल बोलताना दोन दिवसांचा वेळ घेऊन ठरवणार असल्याचं म्हटलं होतं.
मिळालेला माहितीनुसार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण आज, भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी साडे बारा वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांची अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश व्हावा, अशी इच्छा होती. मात्र, आजच अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश होऊ शकतो.
काँग्रेस सोडण्याचा निर्णय हा आपला वैयक्तिक निर्णय असून एक-दोन दिवसांत आपण पुढील वाटचाल जाहीर करू, असे चव्हाण म्हणाले. ते म्हणाले की, मी अद्याप भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लिहिलेल्या पत्रात चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामाही दिला आहे. भोकरचे आमदार चव्हाण हे काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्यही होते. ते नांदेड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदारही होते.