पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २१ : हवामान विभागाने जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने शुक्रवार व शनिवारी रेड अलर्ट आणि पुढील ३ दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यामुळे जेजुरी येथे २३ जुलै रोजी होणारा भारतीय जनता पक्षाचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. जिल्ह्याच्या घाट क्षेत्रातील पावसाची स्थिती आणि पुढील काही दिवसाचा हवामान अंदाज लक्षात घेऊन लाभार्थ्यांना कार्यक्रम स्थळापर्यंत येण्यास कोणताही त्रास होऊ नये या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातर्फे कळविण्यात आले आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योगजकता मार्गदर्शन केंद्र पुणे यांचेमार्फत लाभार्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करुन देण्याकरिता ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जेजुरी येथे २३ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. महारोजगार मेळाव्याची पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येईल. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे सहायक आयुक्त एस. बी. मोहिते यांनी कळविले आहे.












