पिंपरी, २१ जुलै २०२३ :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राथमिक आणि माध्यमिक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, अधिकारी तसेच विद्यार्थी, पालक यांच्या मेळाव्याचे आयोजन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षक करतातच, पण पालकांनीही आपल्या पाल्यासोबत रोज संवाद साधावा तसेच त्याच्या अभ्यासाकडे, आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक यांनी केले.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीने पालकांपर्यंत सुचना पोहोचवल्या पाहिजेत. पालकांनीही आपल्या पाल्याला विश्वासात घेऊन त्यांच्या भविष्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. विद्यार्थ्याचा अभ्यास, आरोग्य, शारिरिक, सर्वांगीण प्रगतीबाबत पालकांनी संवाद साधला पाहिजे तसेच थोडा वेळ काढून आपल्या पाल्याच्या आहाराकडे, अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या पाल्याचा कल, त्याच्यातील प्रतिभा ओळखून पालकांनी त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांचीही त्यामध्ये महत्वाची भूमिका आहे. आपला केंद्रबिंदू हा आपल्या शाळेतील विद्यार्थी आहे ज्याला आपल्याला घडवायचं आहे. त्याचा शारिरीक, बौद्धिक, मानसिक विकास कसा होईल यावर लक्ष केंद्रित करा. तसेच शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची गुणवत्ता योग्य आहे का आणि नसेल तर त्यावर त्वरित योग्य ती पाऊले उचलून गुणवत्ता कशी वाढवता येईल याकडे विशेष लक्ष व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांनी दिले पाहिजे. मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना महापालिका चांगल्या नियोजनासाठी सहाय्य करत असते. व्यवस्थापन समिती किंवा पालकांनी केलेल्या सूचनांचा निश्चितपणे विचार करून याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील.
ज्या १० विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून शिष्यवृत्ती मिळवली त्यांना महापालिकेच्या वतीने भारत दर्शनासाठी पाठविण्यात येणार आहे. या सहलीमध्ये काही शिक्षकांचाही समावेश असणार आहे. हा उपक्रम पुढेही राबविण्यात येईल आणि जे शिक्षक चांगले काम करतील त्यांना गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत पाठविण्यात येईल तसेच त्यांचा सन्मान करण्यात येईल असेही आयुक्त शेखर सिंह यावेळी म्हणाले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत नाव आलेल्या १० विद्यार्थ्यांचा यावेळी आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये युवराज राठोड, वाजित शेख, क्षितीज कामने, शायद शेख, आराध्या चव्हाण, त्रिषा शिरसाठ, परिक्षा ठाकूर, दत्तप्रसाद वाळेकर, महेंद्रकुमार महातो, प्रगती बडगे या विद्यार्थ्यांच्या समावेश आहे.
शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांना आयुक्तांनी शुभेच्छा दिल्या तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी, सदस्य तसेच शिक्षक आणि पालकांनी मांडलेल्या सूचनांवर आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
या मेळाव्याचे प्रास्ताविक शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी केले आणि शालेय उपक्रमांची तसेच मेळाव्यासंबंधित सविस्तर माहितीही त्यांनी दिली.
या मेळाव्यास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि मुख्याध्यापक, शिक्षक संवर्ग, पालक वर्ग, विद्यार्थी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राथमिक आणि माध्यमिक शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत मेळाव्याचे आयोजन












