पुणे प्रतिनिधी
पुणे, दि. २३ : पिंपरी-चिंचवड से सिव्हील कोर्ट या मार्गावर धावणारी मेट्रो शुक्रवारी (दि. २२) अचानक कासारवाडी मेट्रो स्टेशनवर बंद पडली. त्यामुळे मेट्रोतून जाणाऱ्या प्रवाशांना तासभर खोळंबून थांबावे लागले. दरम्यान, नंतर मेट्रो सेवा सुरळित झाली.
सिव्हिल कोर्टकडे जाणारी मेट्रो शुक्रवारी सायंकाळी कासारवाडी मेट्रो स्टेशनवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अचानक बंद पडली. मेट्रो बंद झाल्यामुळे सुमारे तासभर या मार्गावरील मेट्रोची वाहतूक खोळबली. प्रशासनाने तांत्रिक दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा मेट्रो सेवा सुरळीत झाली. अशाप्रकारे अचानक मेट्रो बंद पडल्यामुळे तसेच दरवाजे तातडीने न उघडले गेल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते फुगेवाडी या टप्प्यानंतर 1 ऑगस्ट 2023 पासून पीसीएमसी ते सिव्हील कोर्टपर्यंत मेट्रो सेवा सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोतून अनेक प्रवासी प्रवास करत आहेत. तसेच दैनंदिन विद्यार्थी कामगार व नोकरदार वर्ग मेट्रोचा वापर करू लागलेला आहे. उत्सवामुळे सकाळी सहा ते रात्री बारा या वेळेत मेट्रो सेवा सुरू आहे. तर, पाच मेट्रो दर दहा मिनिटांनी धावत आहेत. दरम्यान, मेट्रो बंद पडल्याबाबत तपासणी करण्यात येईल, असे मेट्रो प्रशासनाने म्हटले आहे.












