पुणे शहरात प्रतिवर्षाप्रमाणे संत श्री तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि.१२/०६/२०२३ ते दि.१५/०६/२०२३ दरम्यान साजरा होणार आहे. आषाढी पालखी सोहळा ही एक ऐतिहासिक परंपरा असून शहरात हा सर्वाधिक लोकप्रिय सोहळा बनला आहे, त्यामुळे पुणे शहर व राज्यातील तसेच परदेशातील पर्यटक सदरचा धार्मिक सोहळा पाहण्याकरीता व अभ्यास करण्याकरीता येत असतात.
सदर पालखी सोहळा महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ संतांचा असल्याने पालखीबरोबर महाराष्ट्रातील बहुतेक करून सर्व भागातील वारकरी या पालखी सोहळयात भाग घेण्यासाठी येतात. वारकरी पालखीचे सुरुवातीच्या ठिकाणापासून शेवटच्या ठिकाणापर्यंत सोबत असतात. पालखी जसजशी पुढे जाते तसतशी वारक-यांची संख्या वाढत जाते. त्याशिवाय पालखीच्या पुढे आणि मागे ब-याच दिंडया असतात. अशाप्रकारे प्रत्येक पालखी बरोबर मोठा जनसमुदाय उपस्थित असतो. सदर पालख्यांशी लाखो भाविक लोकांच्या भावना निगडीत असल्याने कोणत्याही परिस्थितीत या पालख्यांचे आगमनाचे व मुक्कामाच्या ठिकाणी तसेच मार्गक्रमणाचे वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
अशा ठिकाणी काही व्यक्तीकडुन ड्रोन कॅमे-याद्वारे छायाचित्रण होवुन दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरीता सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रणा करीता वापर करणारे संस्थांनी व आयोजकांनी त्याबाबतची पूर्व माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देणे आवश्यक ठरत आहे जेणेकरुन त्याची वेळीच पडताळणी करुन त्याबाबतची सत्यता पटवुन कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेता येईल अशी माझी खात्री झालेली आहे.
त्याअर्थी अमोल झेंडे पोलीस उप आयुक्त, गुन्हे (अति कार्यभार विशेष शाखा) पुणे शहर यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात खबरदारीचे उपाय म्हणून दि.१२/०६/२०२३ ते दि.१५/०६/२०२३ रोजी पालखी सोहळ्याचे ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रणाकरीता वापर करण्यास मनाई असल्याचे आदेश दिले आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहील. सदरचा आदेश दि. ०९/०६/२०२३ रोजी दिला आहे.












