मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 20 जानेवारी रोजी लाखो मराठा समाजबांधव आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. नगर पुणेमार्गे मुंबईत दाखल होणार आहेत. येथील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले जाणार आहे. या आंदोलनाची माहिती काल प्रसारमाध्यमांना दिली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी थेट गृहमंत्री फडणवीसांना इशारा दिला आहे.
मराठा बांधवांना राहण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी वस्तू घेऊन जाव्या लागणार आहेत. त्यामुळे सगळी वाहनं बाहेर काढावीत. कुणाच्याही वाहनांना धक्का लागणार नाही. गृहमंत्री फडणवीस आहेत. पोलिसांनी वाहनं अडविण्याचा प्रयत्न केला तर गृहमंत्र्यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरी जाऊन बसू, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले होते की, येत्या 20 जानेवारी रोजी आंतरवाली सराटी येथून मराठा समाजबांधव मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. या आंदोलनाची सुरुवात आंतरवाली सराटी येथून होणार आहे. लाखो समाजबांधव पायी प्रवास करून मुंबईत येणार आहेत.
या आंदोलनात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. आपल्या मुलांना आरक्षण मिळवून देण्याची ही शेवटची संधी आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गांवर गावकऱ्यांनी समाजबांधवांना सहकार्य करावं. त्यांच्या भोजनाची आणि पाण्याची व्यवस्था करावी, असेही आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केले.












