पुणे शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सतावताना दिसत आहे. त्यातच आता आरटीओ विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी झाल्याचे चित्र आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ)झालेल्या नोंदीनुसार यंदाच्या वर्षी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुणे शहरात एकूण २ लाख ९० हजार वाहनांची खरेदी करण्यात आली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ३६ हजार वाहनांची वाढ झाली आहे. कोरोना आणि त्यानंतरच्या काळात वाहन खरेदीत घट झाली होती. गेल्या वर्षभरापासून वाहन खरेदीने वेग घेतला असल्याचे दिसून येत आहे.
२०२२ मध्ये २ लाख ५४ हजार वाहनांची खरेदी झाली होती. यावर्षी दुचाकी, मोटार कार, बस, ऑटो रिक्षा, मालवाहू मोटारी, टुरिस्ट टॅक्सी आदींच्या खरेदीत वाढ झाली आहे. रुग्णवाहिका, ट्रॅक्टर, ट्रेलर या क्षेत्रातील खरेदीचे प्रमाण घटले आहे.












