बारामती सहकारी बँकेतून ५०० रूपयांच्या नोटा गायब झाल्याची माहिती आहे. त्या नोटा खातेदारांना मिळत नाहीत. आता या नोटा कुठे गेल्या. याचे रहस्य काही उलगडत नाही, अशी पोस्ट ‘एक्स’वर करून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खळबळ उडवून दिली आहे. मतदानाची तारीख जवळ आली असताना रोहित पवार यांनी केलेला आरोप गंभीर मानला जात आहे. यापूर्वी पवार यांनी मुळशी येथील जाहीर सभेत बारामतीमध्ये यंदा धनशक्तीचा वापर होत असल्याचा आरोप केला होता.
‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, या नोटा कुठे गेल्या. याचे रहस्य काही उलगडत नाही. हा निव्वळ योगायोग आहे की पाच दिवसांवर निवडणूक आल्याने धनशक्तीचा सहयोगाने होणाऱ्या हाऊसफुल्ल शोचा परिणाम आहे, हे बारामतीकरच ठरवतील. पुणे जिल्हा बँकेबाबतही असेच बघावे लागेल. रोहित पवार यांनी यापूर्वी सुद्धा ‘एक्स’वर एक व्हिडिओ शेयर केला होता. यामध्ये अजित पवार यांच्या सभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पैसे दिल्याचा आरोप केला होता. या व्हिडीओत महिला मिळालेले पैसे बाहेर काढून दाखवताना दिसत होत्या.