नाशिक : माकप आणि किसान सभेचे गेल्या सहा दिवसांपासून विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. मात्र शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाला आहे. मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील आंदोलन सुरूच राहणार आहे, असे शिष्टमंडळाने जाहीर केले आहे.
त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले माकपाचे आंदोलन लवकरच संपणार असल्याची चिन्ह आहेत.
वनजमीन हक्काच्या विविध तीन मुद्यांसह कांद्याचा हमी दर, शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, आशा व अंगणवाडी सेविकांना किमान वेतन लागू करण्याच्या मागणी अशा विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी सुरगाणा ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर दहा हजार आदिवासी व शेतकरी बांधवांचा मोर्चा आला होता. सोमवारी हा मोर्चा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
शुक्रवारी रात्री उशिरा या आंदोलनावर तोडगा निघाला असला तरी जोपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त मिळत नाही तोपर्यंत मुक्काम न हलविण्यावर आंदोलक ठाम आहेत. आंदोलकांनी ठाण मांडल्यामुळे शहराचा मुख्य स्मार्ट रोडच जाम झाला आहे.
याच मार्गावर कोर्ट, जिल्हाधिकारी कार्यालय आहे. त्यामुळे नागरिकांना याठिकाणी ये-जा करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने आंदोलकांच्या आरोग्याच्या समस्येत वाढ होताना दिसून येत आहे.












