स्पर्धा परीक्षांमध्ये होत असलेल्या गैरप्रकार आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. गैरप्रकार आणि पेपटरफुटीचे प्रकार थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून समिती गठीत करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती राज्य सरकारकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
ही समिती चार जणांची असून यामध्ये सेवानिवृत्त आयएएस अधिकारी असणार आहेत. या समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर हे असणार आहेत. तर इतर सदस्यांमध्ये बृहन्मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुरेख काकाणी, तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी सोळूंके हे असणार आहेत. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिवांचाही या समितीत समावेश असणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसह इतर स्पर्धा परीक्षांमध्ये होत असलेले गैरप्रकार आणि पेपरफुटीची प्रकरणं रोखण्यासाठी उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी समितीवर असणार आहे. या प्रकरणी उपाययोजनांचा अहवाल समितीकडून तीन महिन्यांच्या आत सरकारकडून मागवण्यात आला आहे. त्यामुळे आता पेपरफुटी आणि गैरप्रकारांना लगाम बसणार असल्याचं दिसून येत आहे.












