राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट पडले. त्यात अजित पवार यांनी आता लोकसभेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. त्यात शिरूर लोकसभे संदर्भात त्यांनी खासदारांबाबत वक्तव्य केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या विकास कामाबद्दल वक्तव्य केले होते. त्यावर आता मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या वक्तव्याला पाठिंबा देण्यासाठी सुनील शेळके यांनी दंड थोपटले आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांनी गेल्या साडेचार वर्षांमध्ये त्यांच्या मतदार संघातील नागरिकांच्या कोणकोणत्या समस्या जाणून घेतल्या. कोणकोणत्या गावात ते गेले, ते नागरिकांना भेटले, किती नागरिकांच्या समस्या सोडवल्या, याचा लेखाजोखा घ्यावा आणि मगच दादांच्या वक्तव्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करावा, अशी प्रतिक्रिया सुनील शेळके यांनी दिली आहे. सुनील शेळके म्हणाले की, दादांनी जे काही वक्तव्य केले आहे, ते गेली तीस ते पस्तीस वर्ष दादांचे पुण्याच्या राजकारणात आणि जडघडणीत जे योगदान आहे, आणि ज्या ठिकाणी दादा शब्द देत आहेत तो देखील जनतेच्या विश्वासावर आणि त्यांच्या ताकदीवर देण्याचे काम आजपर्यंत दादांनी केलेले आहे. शेवटी ३० ते ३५ वर्ष जनतेची १६ -१६, १८-१८ तास काम करून पुणे जिल्ह्यात जे विकासाचं काम केले आहे त्याच जोरावर दादांचे हे वक्तव्य आहे.
आमदार सुनील शेळके यांचा अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा












