जमिनीच्या मिळालेल्या पैशाच्या वादातून नात्यातील दोघांनी एका तरुणावर कोयता आणि कुऱ्हाडीने सपासप वार करुन निर्घृण खून केल्याची घटना चाकण येथे घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.१५) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास खेड तालुक्यातील बिरदवडी गावच्या हद्दीतील बैलगाडा शर्यतीच्या घाटात घडली आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
ईश्वर पंडित पवार (वय-३२ रा. बिरदवाडी, ता. खेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ओंकार दगडु काचोळे (रा. रोहकल, ता. खेड), हनुमंत हरिभाऊ नायकोडे (रा. चाकण) यांच्यावर आयपीसी ३०२, ३४ सह आर्म ऍक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे. याबाबत मयत ईश्वर याचा भाऊ प्रभाकर पंडीत पवार (वय-२८ रा. बिरदवडी ता.खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओंकार काचोळे हा मयत ईश्वर पवार याच्या मामाचा मुलगा आहे. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास ईश्वर हा त्याचा बैलगाडा घेऊन घाटामध्ये पळवण्यासाठी गेला होता. त्यावेळी आरोपी दुचाकीवरुन आले. फिर्यादीच्या आईला मिळेलेले बहिणीच्या हिस्स्याचे ५० रुपयांमधून उरलेले १५ ला रुपये दिले नाहीत म्हणून आरोपींनी ईश्वर पवार याच्यासोबत वाद घातला. त्यानंतर ओंकार काचोळे व त्याचा साथीदार हनुमंत नायकोडी यांनी सोबत आणलेल्या लोखंडी कोयता व कुऱ्हाडीने ईश्वरच्या डोक्यात व पाठीवर सपासप वार केले. जखमी झालेल्या ईश्वर याला चाकण येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.












