परदेशातील शिक्षणाकरीता अॅडमिशन व व्हिसा मिळवून देण्याचा बहाणा करुन तरुणांना लाखो रुपये घेऊन फसवणूक करणार्या माय कॉलेज खोज या संस्थेच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे.
सौरभ मनोज झा (वय २६, रा. खराडी), पूनम चंदनसिंग राजपूत (वय २५, रा. रामवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अमितकुमार (वय३८, रा. मगरपट्टा सिटी,हडपसर) आणि प्रतिमा भाटी (वय ३४, रा. हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अंबरनाथ येथील एका २४ वर्षाच्या तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ५२/२४) दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे उल्हासनगर येथून बी एस एस पर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्या सध्या घनसौली येथे नोकरी करीत आहेत. पुढील शिक्षण मास्टर्स इन मॅनेजमेंट स्टडीज अॅन्ड डिजिटल मार्केटिंग या पदवीचे शिक्षण इटली येथे करण्याची इच्छा होती. त्यांनी विमाननगर येथील माय कॉलेज खोज या वेबसाईटवर जाहिरात पाहून संपर्क साधला. तेथील अमितकुमार व प्रतिमा भाटी यांनी त्यांना इटलीचा शिक्षणाकरीता व्हिसा व कॉलमध्ये अॅडमिशन मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी दीड लाख रुपये खर्च सांगितला. त्यानुसार त्यांनी आईच्या बँक खात्यातून पैसे दिले. पाठपुरावा करुनही त्यांचे काम झाले नाही.
तेव्हा त्यांनी विचारणा केल्यावर अमितकुमार याने तुमच्या आईच्या बँक खात्यावर मोठ्या रक्कमेचे व्यवहार नसल्याने तुम्हाला इटलीचा व्हिसा मिळू शकणार नाही़ असे सांगून तुम्ही आणखी ५० हजार रुपये दिले तर आम्ही इटलीचा व्हिसा मिळवून देण्याची जबाबदारी घेऊ, असे आश्वासन दिले. त्यांनी पैसे दिल्यानंतरही त्यांना व्हिसा मिळाला नाही. त्यांनी चौकशी केल्यावर त्यांना इटलीतील कोर्सकरीता प्रवेशदेखील होणार नाही असे सांगितले. आम्ही तुमचे बँक स्टेटमेंट तयार करुन त्यावर बँकेचे शिक्के मारुन स्टेटमेंट तुम्हाला देऊ. तुम्हाला ते व्हिसा कार्यालयात जाऊन दाखवून ती कागदपत्रे तेथे जमा करावी लागतील, असे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी भाजपा युवा मोर्चाच अध्यक्ष करण मिसाळ यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली.
त्यानंतर त्या माय कॉलेज खोज या संस्थेत गेल्या. पोलीस पथक बाहेर थांबले. तेथे उपस्थित असलेल्या सौरभ झा याने त्यांच्या आईच्या नावे असलेल्या बँक खात्याचे प्रींटेड स्टेटमेंट टेबलावर ठेवून त्यांच्यासमोर इंडियन बँकचे नावाचे शिक्के मारले. तेथील पूनम राजपुरोहित हिने कोर्या कागदावर तिचे स्वत:चे हस्ताक्षरात मॅनेजरची सहीची प्रॅक्टीस करुन बँक स्टेटमेंटवरील शिक्क्यामध्ये खोट्या सह्या केल्या. इतक्यात पोलीस पथक अचानक आत आले व त्यांनी दोघांसह सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन तपास करीत आहेत.












