पुणे प्रतिनिधी:
पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करणे, तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केल्याची घटना पुण्यात घडली आहे. कौटुंबिक वादातून ओैषधी गोळीतून महिलेला ब्लेड देऊन तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली.
सोमनाथ साधू सपकाळ (वय ४५, रा. उत्तमनगर) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत छाया सोमनाथ सपकाळ (वय ४२) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ पत्नी छाया यांच्या चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता.
काही महिन्यांपूर्वी सोमनाथचा भाऊ घरी दारु प्यायला होता. त्यावेळी छायाने सोमनाथशी वाद घालून त्याला घरी दारु प्यायला बोलावू नका, असे सांगितले होते. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. सोमनाथने ओैषधी गोळ्यात ब्लेड टाकून त्या गोळ्या पत्नी छाया यांना दिल्या. ब्लेड गिळाल्याने त्यांना त्रास झाला. त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करणे, तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी सोमनाथला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.












