चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ऍलोमा काऊंती या आलिशान सोसायटीच्या परिसरामध्ये एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाच्या प्रमुखावर अज्ञात व्यक्तीने गोळी झाडली. विशेष म्हणजे हा व्यक्ती कोरियन आहे. सुदैवाने ही गोळी त्या व्यक्तीला लागली नाही.
ही घटना मंगळवारी दि. ७ सकाळी सहा ते साडे सहाच्या दरम्यान घडली. याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच चतुशृंगी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी रवाना झाले. तात्काळ आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात करण्यात आली. घटनास्थळावर पोलिसांना एक रिकामी पुंगळी देखील आढळून आली आहे. तात्काळ न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या बॅलेस्टिक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी देखील घटनास्थळावर पाहणी करून ही गोळी नेमकी कोणत्या बंदुकी मधून झाडण्यात आली असावी याचा अंदाज घ्यायला सुरुवात केली.
दरम्यान, गोळीबार झालेली व्यक्ती ही दास कंपनी या बड्या कंपनीची रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाची प्रमुख असून ती कोरियन असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली. पुढील तपास चतुशृंगी पोलीस करीत आहेत. याबाबत राज्य लोकतंत्र च्या प्रतिनिधीने चतुशृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.












