कसबा पेठेतील शेख सल्ला दर्ग्यावर कारवाई होणार असल्याची अफवा पसरवून चिथावणी दिल्याप्रकरणी फरासखाना आणि कोंढवा पोलिस ठाण्यांत ३४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार प्रमोद जगताप यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून माहिती-तंत्रज्ञान कायदा, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख सल्ला दर्ग्यातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून होणाऱ्या कारवाईबाबत काहींनी शुक्रवारी रात्री चुकीची माहिती पसरवली. त्यामुळे कसबा पेठ परिसरात चार ते पाच हजार नागरिक जमा झाले. दोन समाजामध्ये तेढ होईल, अशी अफवा पसरल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कसबा पेठेतील शेख सल्ला दर्ग्यावरील कारवाईबाबत समाजमाध्यमातून अफवा पसरविणे आणि जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी १३ जणांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिस नाईक सुभाष जरांडे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काही जणांनी खातरजमा न करता दर्ग्यावरील कारवाईबाबत अफवा पसरवली. त्यामुळे कसबा पेठेत शुक्रवारी रात्री मोठ्या संख्येने जमाव जमला होता.












