लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असून, कामकाजादरम्यान गोंधळ घालणाऱ्या खासदारांचे निलंबन केले जात आहे. गेल्या चार दिवसात ९२ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आज (दि. १९) आणखी ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.
आजच्या कारवाईनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या खासदारांची संख्या १४१ झाली आहे. आज कारवाई करण्यात आलेल्या खासदारांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, काँग्रेस नेते शशी थरूर आणि कार्ती चिदंबरम, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांचा समावेश आहे.
कामकाजात अडथळा आणल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. १३ डिसेंबरला संसदेच्या सुरक्षाव्यवस्थेला छेदत चार ते पाच जणांनी संसद आणि संसदेच्या आवारात गोंधळ घातला. यातील सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी लोकसभेत खासदारांच्या बसण्याच्या जागेवर उडी घेतली स्मोक अॅटॅक केला. तर नीलम आणि अमोल शिंदे यांनी संसदेच्या आवारात स्मोक कॅन्डल जाळल्या. त्यानंतर काही वेळातच या चारही जणांना पकडण्यात आले.
याशिवाय या चौघांचे साथीदार ललित झा आणि विकी यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. दुसरीकडे या प्रकरणी आठ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाकडूनही एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावर गृहमंत्री म्हणून अमित शाह यांनी दोन्ही सभागृहात निवेदन करावे अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या मागणीवर विरोधक ठाम राहिल्याने लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. सभागृहात खासदारांनी नारेबाजी आणि पोस्टरबाजी करत सरकारचा निषेध केला.












