कोरोना विषाणूच्या ‘जेएन-वन’ या नव्या उपप्रकाराचा संसर्ग झालेला राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग येथे आढळून आला आहे. हा विषाणू वेगाने पसरणारा असला, तरी त्याची लक्षणे सौम्य स्वरूपाची असून, रुग्ण एका आठवड्यात बरा होतो, असे आरोग्य विभागासह वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
केरळ येथे काही दिवसांपूर्वी एका ७९ वर्षीय महिलेला या विषाणूचा संसर्ग झाला होता. आता ही महिला पूर्णपणे बरी झाली असल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले. पुणे शहरात सद्यस्थितीत कोरोना आणि ‘जेएन-वन’ या विषाणूंच्या संसर्गाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
‘जेएन-वन’मध्येही सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, थकवा यासारखी लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवत असलेल्या रुग्णांनीही डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे गरजेचे आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग यासारख्या सहव्याधी असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही डॉक्टरांनी केले आहे.
जेएन-वन विषाणूबाबत काळजी घेण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नागरिकांनी नियमांचे पालन करावे. – तानाजी सावंत, आरोग्यमंत्री












