नागपूर : राहत्या घरी गळफास घेऊन पोलीस उपनिरीक्षकांची आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गोपाळ गोळे (वय ३४) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. गोळे हे गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस वसाहतीत रहायला होते. सध्या ते यशोधरानगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
मागील काही दिवसांपासून त्यांची पत्नी बाहेरगावी होत्या. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा मोबाईल बंद होता. त्यांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात संपर्क केला तेव्हा गेल्या तीन दिवसांपासून ते पोलीस ठाण्यालाही आले नसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांना संशय आला. तेव्हा दोन पोलीस कर्मचारी गोळे यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी गोळे यांनी घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळन आली नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली असून अधिक तपास केला जात आहे.












