९,५८,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त
लाकडी दांडके, लोखंडी टॉमीने मारहाण करुन सहा जणांच्या टोळक्याने डुकरे भरलेला टेम्पो घेऊन पळून गेले. हा प्रकार गुरुवारी (दि.१६) दुपारी चारच्या सुमारास खेड तालुक्यातील कुरुळी गावच्या हद्दीत घडला. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करुन चार जणांना अटक केली आहे.
याबाबत किशोर संपत साबळे (वय ३९, रा. कानिफनाथ कॉलनी, ता.जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजकुमार महेंद्र रीडलान (वय ३१, रा. झेंडेमळा, देहूरोड), समाधान पांडुरंग राठोड (वय ३२, रा. निघोजे, ता. खेड), राम मदन मोठे (वय ३१, रा. खराबवाडी ता. खेड) आणि सोमनाथ अंकुश येळवंडे (वय ४१, रा. निघोजे, खेड) यांना अटक करण्यात आली आहे. तर, त्यांच्या दोन साथीदारांविरोधात आयपीसी ३९५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पिकअप गाडीत असलेले डुकरे मोकळे करण्यासाठी गाडी रोडवर उभी केली होती. ते डुकरांची पाहणी करत असताना स्पायसर चौकाकडून तीन दुचाकीवरुन सहा जण आले. त्यापैकी एकाने दुचाकी आडवी लावून फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने व लोखंडी टॉमीने पायावर मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांचा मोबाईल व डुकरे असलेला पिकअप (एमएच २० ईएल ८४७९) गाडी जबरदस्तीने पळवून नेली.
आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून ९ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चार आरोपींना अटक करून ९,५८,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.












