राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. आम्हाला दहा टक्के आरक्षण नको तर मराठा समाजाची सगे-सोयरेची मागणी मान्य करा अशी भूमिका मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची आहे.ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान निवडणुकीला उभं राहा, राजकारणात या आणि आपल्या मागण्या मान्य करा असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.प्रकाश आंबेडकर यांचं बरोबर आहे, त्यांना माहितीये जोपर्यंत सगळा समाज एकत्र येत नाही तोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत.
परंतु सध्या आपला अजेंडा हा राजकारण नसून, ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण मिळून देणे, त्यासाठी सगे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करायला लावणे, हा आपला अजेंडा असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. माला राजकारणातलं काही कळत नाही, मात्र मी मराठा समाजाची हार होऊ देणार नाही असंही जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.
मराठा समाजाच्या बाबत फडणवीसांच्या मनात द्वेष आहे, मला जेलमध्ये टाकलं तर, त्यांना दिसेल मराठा समाज काय असतो ते, जसा कापूस फुटल्यानंतर संपूर्ण शेत पांढरं दिसतं तसं सर्वत्र मराठेच -मराठे दिसतील. महाराष्ट्र अशांत करू नका, माझ्यावर दबाव आणू नका, मी राजकीय टीका केलेली नाहीये. पण ते राजकारणी आहेत. मी दहा टक्क्यांचं आरक्षण स्विकारलं तर मी चांगला आणि नाही स्विकारलं तर याला गुंतवा, अशी यांची भूमिका आहे. त्यामुळे माझा संयम सुटला. मी नेत्याला बोललो तर मराठा समाजाच्या नेत्याला राग येण्याचं कारण काय? असा सवाल यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.












