कंपनीत गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याची सव्वातीन लाखाची आर्थिक फसवणूक केली आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क येथील लिबर्टी कॉम्प्लेक्स येथे घडला आहे. याप्रकरणी तिघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पुजा सोनवीर यादव (वय-३५ रा. यमुनानगर, लोखंडवाला बॅक रोड, अंधेरी वेस्ट, मुंबई) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून झुबेर बशीर अहमद, नुरेन झुबेर अहमद, सुफीयान झुबेर अहमद (सर्व रा. मिल्लतनगर, अंधेरी वेस्ट मुंबई) यांच्यावर आयपीसी ४२०,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी व त्यांचे पती साजीद अली यांना मिकासा होमस्टेज व्यवसाय असल्याचे सांगितले. तसेच ए.आय.आर.बी.एन.बी या कंपनीसोबत टायप असून हा व्यवसाय पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात करत असल्याचे सांगितले. आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्या कंपनीत पैशांची गुंतवणूक करण्यास सांगितले. गुंतवलेल्या पैशांवर जास्त नफा देण्याचे आमिष आरोपींनी फिर्यादी यांना दाखवले.
त्यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी व त्यांच्या पतीने ३ लाख २५ हजार रुपये गुंतवले.
मात्र, त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना कोणताही नफा किंवा घेतलेले पैसे परत न करता फसवणूक केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पुजा यादव यांनी मंगळवारी (दि.२१) कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करीत आहेत.












