पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २४ : जुन्या भांडणावरुन वाद घालून दोघांनी एका तरुणावर सत्तुरने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच कारच्या बोनेटवरुन फरपटत नेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना भोसरीत घडली आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.२३) रात्री आळंदी रोड परिसरात घडली आहे.
या घटनेत प्रशांत विनायक नकाते (वय-३० रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) हे जखमी झाले असून त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी रुपेश रमेश बैचे (वय-३१ रा. चक्रपाणी रोड, भोसरी, सध्या रा. हनुमान कॉलनी, आळंदी रोड, भोसरी), विशाल प्रकाश भोईर (वय-२१ रा. हुतात्मा चौक, आळंदी रोड, भोसरी) यांच्यावर आयपीसी ३०७, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचा कुरिअरचा व्यवसाय आहे. फिर्यादी आणि आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. आरोपींनी गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास आळंदी रोड परिसरात फिर्यादी यांच्यासोबत जुन्या भांडणावरुन वाद घातला. रुपेश बैचे याने फिर्य़ादी यांच्या कानशीलात लगावत सोबत आणलेला सत्तूर बाहेर काढला. त्याने प्रशांत नकाते यांच्या पोटात सत्तूर भोसकून गंभीर जखमी केले. तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नाहीतर आरोपींनी त्यांच्या कारच्या बोनेटवरुन फिर्य़ादी यांना फरपटत नेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.












