ड्रगमाफिया ललित पाटील प्रकरणात पुण्यातील ससून रुग्णालयाचे तत्कालीन डीन डॉ. संजीव ठाकूर यांना अटक होऊ शकते. डॉ. ठाकूर यांच्या विरोधात पोलिसांच्या हाती सबळ पुरावे आले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्याचा प्रस्ताव मुख्य सचिव पातळीवर पाठवण्यात आला आहे.
गेल्या वर्षी ड्रगमाफिया ललित पाटीलला बंगळुरूमधून अटक करण्यात आली. तत्पूर्वी त्याची नाशिक जिल्ह्यातील शिंदे गावातील ड्रग्जची फॅक्टरी मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केली. त्यावेळी गुन्हे दाखल असूनही ललित पाटीलचा ससून रुग्णालयात मुक्काम होता आणि त्याच्या डोक्यावर वरिष्ठांचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते.
आता या प्रकरणी डॉ. संजीव ठाकूर यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांना सबळ पुरावे सापडले आहेत. म्हणूनच त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या मुख्य सचिवांना प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावात डॉ. ठाकूर यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याचे नमूद केले आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास डॉ. ठाकूर यांना अटक होण्याची शक्यता आहे.












